Friday, July 22, 2016

जिद्दीची चढाई......हरि-हर..( हर्षगड )

     अनेक वर्ष झाली ट्रेकींगच भुत काही डोक्यावरून उतरत नव्हते.  कॉलेज जीवनात ट्रेकींगची खुप आवड आणि ओढ होती.  परंतु आमच्या रत्नागिरी मध्ये ट्रेकींग करणा-या संस्थांचा अभाव असल्याने ट्रेकींगची हौस काही पुरी करता आली नाही.  अगदी लहानपणापासुन डोंगर,द-याखो-यांतुन भटकंती करायची आवड....रात्री अपरात्री रानावनांतुन फिरायची सवय व आवड देखील....... आवड कायम धाडसी निर्णय घेण्याची व साहस दाखवण्याची कायम खुमखुमीच अंगात जणू भरलेली... बर ती अजुनही कायम आहे.... लहान पणी मला आठवतय, आमच्या घराजवळ जवळ-जवळ 60 ते 65 फुट उंचीची एक विहीर होती...( आता ती बुजवुन नवीन विहीर पाडली आहे ) ही विहीर दगडाने बांधलेली नसल्याने दर पावसाळ्यात तिच्या भिंती ठिसुळ होउन माती आत पडायची. विहीरीत उतरायला पाय-या मातीच्य़ा भिंतीला पाडलेल्या.... पाय-या कसल्या पायाच्या तळव्याचा पुढील भाग टेकता येईल अशी भिंतीत पाडलेली भोक.  अशा विहीरीत मी लहानपणी छोट्याश्या दोरीने कायम उतरायचो.... ते आज देखील या वयात माझ्या रहात्या तिन मजली ईमारतीच्या बाहेरील ग्रीलला धरून तिस-या मजल्यापर्यंत चढण्याचे धाडस चालुच आहे.

      हे सांगण्याच एवढच कारण की ती जिद्दीची खुमखुमी अजुनही तशीच आहे..... हो मात्र हे सर्व करताना अतीरेक मात्र नक्की नाही.  स्वत:च्या जिवाचा,सुरक्षेचा पुर्ण विचार करून नंतरच निर्णय घेण्याची क्षमता आजही तशीच आहे.

      या जिद्दीच्या खुमखुमीला पुन्हा वाट मिळाली ती सुध्दा जिद्दी मुळे.  साधारणत: जानेवारी 2016 मध्ये.  फेसबुकवर असताना चाळता-चाळता इव्हेंट मध्ये JIDDI Moutaineering Association च्या इव्हेंटवर नजर गेली..... 28 फेब्रुवारी 2016 ''हरी-हर'' गड ट्रेकींग...... तसे  JIDDI Moutaineering Association बद्दल थोडसच ऐकून होतो.... परंतु कॉन्टॅक्ट नंबर नसल्याने संपर्क साधता येत नव्हता.......

      ''हरी-हर'' गड वाचल्या बरोबर प्रथम यु ट्युब  वर फोटो बघण्याचा कायर्क्रम, नंतर लगेच व्हिडीओ बघण्याचा कार्यक्रम व त्याची संपुर्ण माहिती वाचण्याचा कार्यक्रम पुर्ण झाला....... ते फोटो,व्हिडिओ बघुन व माहिती वाचुन मी जणू त्या हरी-हर च्या प्रेमातच पडलो...... निश्चय झाला ट्रेकींगला जायचेच..... लगेच जिद्दीच्या मेंबरशी संपर्क.......नाव नोंदणी ..... आणी फायनल....


       ''हरी-हर'' बद्दल थोडी माहिती....      ''हरी-हर'' गडालाच ''हर्षगड'' असे देखील म्हणतात.  हा नाशिक जिल्ह्यात असुन त्रंबकेश्वरच्या परिघात आहे. समुद्र सपाटी पासुन साधारण 3500 फुटावर आहे. हा त्रिकोणी आकारात असल्याने त्याच्या तिन्ही बाजु नैसर्गिक रित्या उंच कड्याच्या असल्याने तो अतीशय कठीण मानला जातो. या किल्ल्यावर एक हनुमानाचे आणी शंकराचे मंदीर आहे. सन 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड ताब्यात घेतला. 8 जानेवारी 1689 रोजी मुगल सरदार मात्तबर खान याने मराठ्यांकडुन हा गड ताब्यात घेतला.  1818 मध्ये ब्रिटीशांनी तो आपल्या ताब्यात घेतला. या गडाच्या पाय-या पुर्ण काळ्या उभ्या कातळात जवळ जवळ 80 अंशाच्या कोनात कोरलेल्या 117 पाय-या आहेत. ज्यावेळी हा गड इंग्रजाना ताब्यात घेतला त्यावेळी एक इंग्रज अधिकारी या पाय-या नष्ट करण्यासाठी आला असता, त्या पाय-या पाहूनच तो त्या गडाच्या प्रेमात पडला.

      ऑफिसमध्ये आता याचीच चर्चा सुरू झाली..... माझ नेहमी एक काम असत, ते म्हणजे प्रत्येक कामात,मोहिमेत सर्वांना सहभागी करून घ्यायच.   त्याप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये कोण कोण येणार याची मी चाचपणी करायला सुरूवात केली.  लगेच काहींचा होकार पण आला... परंतु माझ्यासारखी इतरांना देखील सवय..... इंटरनेटवर हरी-हर सर्च झाला... त्याच्या त्या पाय-या काहींच्या उरात धडकी भरणा-या ठरल्या.  झाल मी एकटाच पडलो पण जायच पक्क होतेच.

      नाव नोंदणी साठी जिद्दी च्या ग्रुप मेंबर श्री. धीरज पाटकर यांचेशी संपर्क साधला.  त्यावेळी त्यांनी मी स्वत: तुमच्या ऑफिस मध्ये येईन असे सांगितल्या नुसार ते व त्यांचे सहकारी श्री. अरविंद एके दिवशी माझ्या ऑफिस मध्ये आले.  ते येण्या पुर्वी मला वाटत होत की, कोणी ज्येष्ठ, वयाने मोठी व्यक्ती असेल.  परंतु प्रत्यक्ष जेव्हा भेट झाली त्यावेळी नुकत्याच कॉलेज मधुन बाहेर पडून अगदी जिद्दीने स्थापन केलेल्या एका ग्रुप मेंबरची भेट झाली.  अगदी तरूण वयातच अशा गोष्टी घडत असतात.  त्यांनी त्यांच्या या ग्रुपच नाव "जिद्दी" का ठेवल ते त्यांच्या तरुण पणाच्या जिद्दीतच आल.

      मला मुळातच खुप बडबड करण्याची सवय, मला माझ्या आवडत्या विषयांवर खुप बोलायला आवडत.  हे माझ्या पत्नीने वाचल तर ती म्हणेल, थोड घरात देखी जास्त बोलायला सांगा यांना.... माझ्या बडबड्या स्वभावामुळे मी धीरज आणी अरविंदचा वेळ जवळ-जवळ 1 ते दिड तास बोलण्यात घेतला. मला त्यांच्या चेह-यावर त्यांना होणारा उशीर जाणवत होता परंतु माझ्या स्वभावाला औषध नाही.. या एक ते दिड तासात जिद्दीने अनेक राबवलेल्या उपक्रम, ट्रेक यांचे त्यांनी फोटो,व्हिडीओ दाखवले.  त्यांने मी खुप प्रभावीत झालो. आणी नक्की झाल यापुढे जिद्दी सोबत आपली जिद्द....

      जवळ जवळ कॉलेज जीवनानंतरचा 26 ते 27 वर्षाचा काळ लोटला होता.  त्यामुळे ट्रेकची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  मग ट्रेकची घरात चर्चा सुरू.  मोठा मुलगा इंजिनियरींगच्या तिस-या वर्षात शिकत होता.  त्याला सोबत घेउन जाण्याची फार इच्छा होती. परंतू हल्ली च्या मुलांना मोबाईल हा जवळचा मित्र झाल्याने ती काही पुर्ण झाली नाही... प्रयत्न सुरू आहेत.  मग काय जिद्दीच्या धीरज पाटकर यांचे बरोबर संवाद सुरू... बरोबर काय काय न्यायचे हा मोठा प्रश्न.  अनुभव नसल्याने नंतर कसा फज्जा झाला ते वाचालच.... मग धीरजने व्हॉट्स अॅप वर एक हरी-हर नावाचा ग्रुप केला त्यामध्ये मला अॅड केल.... मग काय त्यावर मी नवीन असल्याने फक्त इतरांचे चॅटींग वाचण्या पलिकडे काहीही करू शकत नव्हतो...... मी गप्प.....मग धीरजने ट्रेकला जाताना काय-काय न्यायचे,त्याची फी,जाण्याचा-येण्याचा प्लॅन....याची अगदी व्यवस्थीत माहीती ग्रुपवर टाकली.

      आणी तो दिवस उजाडला.....      आदल्या दिवशी निघण्याची तयारी आणी उत्साह ठासुन ठासुन भरलेला... न्यायचे काय हा मोठा प्रश्न.  ठरल्या नुसार सर्व सामान घेताना दोन बॅगा झाल्या.... ट्रेकींगचा सध्याचा अनुभव नसल्याने चुकीच्या बॅगांची निवड झाली... एक ओढायची बॅग व एक सॅक......

      दि. 27/02/2016 सायंकाळची जनशताब्दी ट्रेन.... 4 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जमायचे ठरल्या नुसार सर्व स्टेशनवर भेटलो.  मी कायम दिलेली वेळ पाळणारा.... या सवयी नुसार स्टेशनवर लवकर हजर.  सर्व काही नवीन.. आलेल्या ट्रेकर्सनी जवळ - जवळ सगळ्यांनी फक्त सॅकच आणल्याने आणी मी मात्र बॅग घेउन आल्याने प्रथम मलाच कसेतरी वाटू लागल.  पण मनात म्हटल प्रत्येकाच पहिल्यावेळी हेच होत असणार.  हळुहळु एक एक जमता जमता एक - मेकांशी ओळखी होऊ लागल्या. आणी आमची जनशताब्दी हरी-हर ट्रेकर्सना घेऊन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. मग गाडीत साधारण गप्पा टप्पा..... मी नवीन असल्याने जरा सावध पवित्रा...... मग झाले सेल्फी सुरू.... आमच्या जिद्दी ग्रुपच एक वैशिष्ठ आहे. काही झाल तरी चालेल मग ग्रुप लिडर काहीही म्हणो सेल्फी मात्र काढायचेच काहीही सोडायच नाही...... अहो 1 नी 2 नव्हे ...... मनाच समाधान.... आणी मोबाईलची मेमरी.... संपेपर्यंत सेल्फी काढत रहायच.... ही मात्र एक छान सवय या ग्रुप मेंबरना आहे.  स्वत:ची सेल्फी पेक्षा इतरांसमवेत सेल्फी जास्त काढल्या जातात. रेल्वेत मग धमाल मस्ती सुरू..... 


असलेल्या ट्रेकर्स मध्ये त्यातल्या त्यात वयाने मीच मोठा असल्याच माझ्या लक्षात आल.... हा आता ज्यांना ज्यांना माझे खर वय कळल्यावर ते थोडे जरा बिचकल्या सारखे वाटले.  परंतु मला लहानपणापासुन कोणाशीही जुळवुन घ्यायची सवय.... या सवयी प्रमाणे मी पण त्यांच्यातलाच एक कॉलेजकुमार कधी होउन गेलो ते माझ मलाच समजल नाही....... रात्रीच्या जेवणाचे डबे आणायचे आधीच ठरल्या नुसार रात्रीच जेवण रेल्वेतच पार पडल.... मग एकमेकांच्या घरातुन आलेले पदार्थ वाटुन घेउन खाताना मला परत कॉलेज व शाळेच्या जीवनाची आठवण झाली... त्यावेळी जस आपला डबा दुस-याला देउन दुस-याच्या डब्यावर कायम लक्ष असायच तसच आज झाल पण ते इतराना न जाणवू देता...मग काय भरपेट व्हरायटी जेवण... यात रात्री 11 वाजता कधी छत्रपती शिवाजी टर्मिनल केव्हा आल ते समजल देखील नाही.

      इथे मुंबईचे ट्रेकर्स आम्हाला जॉइन होणार आहेत अस समजल्याने माझ्या छातीत थोडी धड-धड वाढली...... कारण मुंबई वाले म्हणजे जरा हाय-फाय.... असा माझा समज.... व त्यात मुली असल्या तर अतीशय अवघड.... कारण आम्ही गावाकडची माणस.... अस मुंबईकर नेहमी समजतात त्यामुळे असलेला गैरसमज मनात होता....कालांतराने तो चुकीचा ठरला ते वेगळ.... परंतु तो पर्यंत काय झाल मुंबईकर जमु लागले.. त्यात धीरजने सांगीतले होते की त्यात दोन नर्स आहेत म्हणुन... मग काय आणखी धड-धड.... कारण नर्स म्हटल की इंजेक्शन,ती सुई,इत्यादी डोळ्यासमोर दिसु लागल्यावर कोणाची धड-धड.... वाढणार नाही... यातच त्या नर्स आणी मुंबईचे ट्रेकर्स आले.. मी जरा बाजुलाच झालो.... त्यांच्या ओळखीचे रत्नागिरीतील मुले त्यांच्याशी गप्पा टप्पा,मस्करी करू लागल्यावर मला जरा अवघडल्यासारख झाल.  परंतु त्यांच्यात एक विवाहीत स्त्री व तिच्या 9 वि तील मुलाला पासुन मात्र मला खरच त्यांच्या जिद्दीच कौतुक करावस वाटल. कारण शक्यतो ट्रेक म्हटला की यंगस्टार मुलच भाग घेतात. किंबहुना मुंबईतुन जाणा-या अनेक ग्रुप मध्ये ट्रेकर्स हे तरुणच असतात.  परंतु या परंपरेला फाटा आमच्या रत्नागिरीच्या जिद्दी ग्रुपने दिला.  त्यांनी या ट्रेकमध्ये तरुणांबरोबरच विवाहीत लोक, त्यांची मुल, यांना सामाहून घेतल होत.  हे पासुन मला या ग्रुपचा खरच खुप अभिमान वाटायला लागला.

      सगळे जमल्यावर आमचा प्रवास छत्रपती शिवाजी टर्मिनल ते कसारा असा सुरू झाला..... थोडी थंड हवा....लागत लागत ...... पहाटे 3 वाजता आम्ही झोपा काढत कसाला स्टेशनला उतरलो.... झोप कसली डुलक्या म्हणा ना.... दचकत दचकत येणारी झोप... परंतु कसारा येथे आल्यावर थंडीने आपली ओळख दाखवायला सुरूवात केली.  स्टेशनला उतरल्यावर जरा फ्रेश होउन लगेच जीपने कसारा ते हरी-हर असा रस्त्याने प्रवास सुरू झाला.  जिद्दीच्या मेंबरची एक चांगली गोष्ट इथे मला नमुद करावीशी वाटते... पुर्ण ट्रेकचे परिपुर्ण नियोजन....ट्रेकच्या आधी 8 दिवस स्वत: धीरज, अरविंद हे हरि-हर गडावर येउन गेले.  संपुर्ण प्लॅनिंग..... गाडीचा प्रवास सुरू होण्यापुर्वीच मी धीरजला सांगुन ठेवल होत की मला रस्त्याने प्रवासात गाडीत पुढे बसण्य़ाची व्यवस्था कर.   कारण माझा मोठा प्रॉब्लेम म्हणजे रस्त्याने गाडीतुन प्रवास... मला गाडी प्रचंड लागते.... प्रचंड म्हणजे वाचणा-यांना अतिशयोक्ती वाटेल की जर मला गाडी लागायला सुरूवात झालीच तर काही खर नाही.... अगदी अॅडमिट करेपर्यत माझी मजल जाउ शकते...मी स्वत: 9 वी त असल्या पासुन सर्व प्रकारच्या गाड्या अगदी ट्रक सुध्दा चालवतो..... माझा स्वत:च्या मालकीचा ट्रक देखील होता... त्यामुळे मला ड्रायव्हिंग कीतीही किलोमीटर करायला सांगीतल तर मी ते करू शकतो, परंतु गाडीत मागे कींवा अगदी कडेला बसुन जाणे मी नेहमी टाळत असतो.... अशातच हा इगत पुरी ते हरी-हर 8 कि.मी. प्रवास...... माझ्या पोटात विचार करून रत्नागिरीतच गोळा आला होता..... परंतु धीरजने शब्द दिल्यानुसार माझी पुढे बसण्याची वेवस्था केल्याने व संपुर्ण प्रवास रात्रीचा असल्याने मला या वेळी गाडी लागण्याचा त्रास मात्र झाला नाही....यात गंमत म्हणजे मी नवीन मेंबर व वयाने पण मोठा असल्याने काहींना मला बोलता आले नाही की तुम्ही जरा मागे बसा..... याचा थोडा फायदा मी उठवला पण माझा पण नाईलाज होता.... या 80 कि.मी. प्रवासात मी एकदापण झोपलो नाही.  कारण मी ड्रायव्हिंग मध्ये दोनच व्यक्तींवर आयुष्यात विश्वास ठेवतो एक मी स्वत: आणी एक माझा जिवश्च कंठश्च लहानपणीचा मित्र आहे.... बाकी कोणावरही नाही.... मग तो कीतीही चांगला ड्रायव्हर असला तरी ही.... आणी यामुळेच मी शेवट पर्यंत जागा होतो.

      या प्रवासातील गंमत म्हणजे या जीप मध्ये मी दरवाज्याच्या बाजुला मध्यभागी आमचा भलाभक्कम, सदा-खादाड, कायम नेटवरगेम खेळणारा, कायम दुस-याचे व्हॉट-स्पॉटने नेट वापरणारा असा चैतन्य हा होता.  त्यामुळे त्याने जणुकाही पुर्ण गाडी विकत घेतल्या सारखा तो बसल्याने मला अंग चोरून बसाव लागल.  कदाचीत तो मनात म्हणत असेल यांना कीतीशी जागा लागणार.... त्यातच त्याला चालु गाडीत डुलकी लागली तर त्याची 25 किलोची मान माझ्या खांद्यावर.... आता तुम्हीच सांगा माझ्या खांद्याला 25 कि. वजन झेपेल का.... ही थोडीशी गंम्मत होती...... आमच्या ग्रुप मध्ये ज्याची जास्त चेष्टा करावी असा हाच एक असल्याने त्याच्या बद्दल प्रेमाच्या गोष्टी.........  त्यात गाडीचा ड्रायव्हर पण तराट चालवत होता..दे दणादण.... एकदा तर रस्त्याच्या कडेला पार भोज्जा करून आला त्यावेळी या चैतन्याची पार कायमची झोप उडाली... असा प्रवास करत करत आम्ही 4.30 वाजता हरी-हर गडा जवळच्या निगुडपाडा गावात उतरलो.

      गावात धीरजने त्याच गावच्या सरपंचांकडे रहाण्याची व्यवस्था केली होती.  सरपंचांच्या घरी गेल्यावर बघीतले तर आधीच एक ट्रेकरचा ग्रुप येउन त्यांच्या अंगणात झोपला होता.  आम्हाला बसायला देखील जागा नव्हती.  मग त्यांच्या घरा शेजारीच असलेल्या एका शाळेच्या व्हरांड्यात आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणी तीथेच बसलो. त्यानंतर बॅटरीच्या प्रकाशात एका बाजूला असलेल्या विहिरीकड़े आम्ही आमचा मोर्चा वळवला.... सरपंचांच्या घरापासुन साधारण 500 मिटर वर असणारी ती विहीर...... रात्रीचा चांदण्यांचा तो मंद प्रकाश.... रात्रीचे किड्यांचा कर्कश आवाज... झोंबणारी थंडी..... शेताच्या बांधावरून चालत जाण्याचा तो आनंद..... आणी याच मंद प्रकाशात तो आम्हाला गवसणी घालणारा हरि-हर गड जेव्हा दिसला तेव्हा जो आनंद वाटला त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे.....

      प्रथम पुरूष मंडळींनी विहिरीवर जाउन ब्रश करणे ठरल्यानुसार आम्ही त्या विहीरी जवळ गेलो.  विहीरीचा आकार खुप मोठा परंतु खोली मात्र बेताचीच... विहीरीतील पाणी पाहुन मात्र आम्हा सगळ्यांनाच घाम फुटला कारण पाणी जवळ-जवळ खदुळ होते. चंद्राच्या शितल छायेत जणु त्याने दुधाचा रंगच धारण केल्यासारखा भासत होता... परंतु आमच्याकडे या पाण्या शिवाय पर्याय नव्हता.  मी या पुर्वी श्री. जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदे हर हे पुस्तक वाचले होते.  श्री. जगन्नाथ कुंटे यांनी नर्मदा मैय्याची 3 वेळा पायी परिक्रमा केली होती.  एक परिक्रमा करणे म्हणजे साधारणत: 3500 कि.मी. पायी चालणे ते सुध्दा 6 महिन्यात. म्हणजे दिवसाला सरासरी 30 कि.मी.  या परिक्रमेच्या वर्णनाच्या पुस्तकातील वर्णन माझ्या डोळ्यासमोर या विहीरीवर आल्यावर आले.. मनात म्हटल अशा परिक्रमेत कोणत्या कोणत्या प्रकारचे पाणी प्यायला मिळाले असेल त्यांना, त्यांनी कधी नाक मुरडले नाही मग तु आज का नाक मुरडतोस असा मी स्वत:लाच प्रश्न विचारून त्या विहीरीवर ब्रश करून तोंड धुण्याचा कार्यक्रम उरकला.. मोकळी प्रचंड जागा असल्याने काहींनी बाकीचे विधी उरकुन घेतले..... यात सुध्दा गंम्मत असते हा.... तुम्ही म्हणाल त्यात काय आली गंम्मत डोंबलाची...पण सांगतो... जे - जे वाट मिळेल तिकडे जाउन आले.... जाताना ठरायच..... पुढून कोण येताना दिसला की बोंबलायच.... काही काळोखाच्या भितीपोटी जवळच..... तुम्हीच काय ते समजा.......

      आम्ही पुरूष मंडळी आल्यावर इतरांचा नंबर..... अशा त-हेने प्रात:कालचा कार्यक्रम उरकला.... पण हे सर्व करताना जिद्दीचे शेड्युल पुर्ण टाईट..... शेड्युल प्रमाणेच सर्व उरकण्याकडे धीरज, अरविंद, राकेश यांचा नेहमी कल असतो.  त्यामुळे कोणत्याही कामासाठी ठरावीक टायमिंग दिलेले असते आणी आधीच सुचना असतात.  मात्र सर्व मेंबर देखील त्या आज्ञेने पाळतात..इथे ग्रुप लिडर हा वयाने लहान आहे की मोठा हा प्रश्न नसतो, तर तो ग्रुप लिडर अनुभवी आहे याला खुप महत्व असते.  त्यामुळे मी देखील धीरजच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करायचे येतानाच ठरवले होते.

      धीरज,अरविंदने आधी ठरवल्या प्रमाणे सरपंचांनी सकाळी 4.15 ला कांदे पोहे व चहा सकाळच्या नाष्ट्याला तयार ठेवले होते........ आता सकाळी 4.15 ला नाष्टा....... मोठ प्रश्नचिन्ह......... परंतु इलाज नव्हता..... थोडेसे कांदा पोहे खाउन घेतले.... इतर मित्रांनी देखील नाष्टा केला आणी आम्ही सकाळी बरोबर 5.10 ला हरी-हर गडाकडे प्रयाण केले.... निघण्यापुर्वी धीरजने सर्वांना चालण्याच्या,बोलण्याच्या,फोटो काढण्याच्या इत्यादी बाबतीत सुचना केल्या.  प्रथम त्या सुचना काही वेळा चुकीच्या वाटल्या परंतु ट्रेक जेव्हा पुर्ण होतो तेव्हा सकाळी निघताना केलेल्या सुचना किती योग्य होत्या त्याचे महत्व नंतर कळते... कारण त्या अनुभवाच्या सुचना असतात..... सकाळी जरी पहाट झाली असली तरी पुर्ण काळोख असल्याने आम्ही बॅटरीच्या उजेडात चालत होतो. एका पाठोपाठ एक चालताना खुप मजा वाटत होती......... अरविंद हा आम्ही येण्या आधी 8 दिवसापुर्वीच एकदा हरी-हर वर येवुन गेला होता.  जिद्दीच एक वैशिष्ठ येथे सांगण्यासारख आहे.  जरी कीतीही वेळा एखाद्या ठिकाणी ट्रेक केला असेल तरीही त्या ठिकाणी पुढच्या ट्रेकच्या पुर्वी एकदा जिद्दीचा एक तरी मेंबर पुनश्च पहाणी करून जातो.  कारण पुर्ण वर्षात अनेक बदल होत अतात अशावेळी येणा-या ट्रेकर्स ची सुरक्षितता महत्वाची असल्याने जिद्दी ग्रुप नेहमी ट्रेकर्सच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देतात...सुरक्षीततेच्या दृष्टीने यांनी प्रथमोपचार सामुग्री नेहमीच बरोबर घेतलेली असते..... ग्रुप बरोबर 3 वॉकि टॉकी कीट आहेत..... त्यामुळे आलेल्या मेंबरचे तीन-चार ग्रुप करुन त्यांच्यामधे coordination चांगल्या प्रकारे करता येते....

      अशा प्रकारे काळोखातुन चालताना खुप मजा येत होती..... शेताच्या बांधावरुन..... कधी शेतातुन त्या शितल चांदण्यात रात्री चालण्याचा अनुभव हा प्रत्येकाला परमोच्च आनंद देणारा होता. प्रथम 1 कि.मी सरळ चालुन गेल्यावर प्रत्यक्ष डोंगराची चढाईला सुरूवात झाली. मध्येच आम्ही गप्पा मारत चालत होतो... परंतु धीरजचा कटाक्ष गप्पा न मारता चालत रहाण्यावर होता.  त्याला कारण देखील तसेच होते.  हा अनुभवाचा भाग होता.  गप्पा मारल्याने तोंड उघडल्याने चालताना अतिरिक्त उर्जा खर्ची पडून दम लागण्याचा जास्त धोका होता आणी हेच धीरजला टाळायच होत. यामध्ये पुनम गडकर जरा जास्तच गप्पा मारत होती.... त्यामुळे धीरज सारखा तीला न बोलता चालण्याला सांगत होता..... मी आणि नेहा शेवडे एका पाठी एक चालत होतो....... मुंबईहून आलेल्या मध्ये सौ.अर्चना राजपंगे व त्यांचा 9 वी इयत्तेत असणारा कु.संकल्प राजपंगे आमच्या पुढे चालत होते. धीरज प्रत्येकाला मोटीव्हेट करत होता. जिद्दीच्या प्रत्येक मेंबरचे प्रत्येकाकडे लक्ष होते.  काही मेंबर पुढे गेले होते त्यांच्याशी वॉकि-टॉकी वरून कायम संपर्क साधला जात होता.... तसा हा जंगल सदृष्य भाग.  परंतु आमच्या कोणाच्याही मनात कसलीही भिती म्हणुन नव्हती.

      धीरजला अनुभवा मुळे आम्हाला कधी आणी कोणत्या वेळेत व कोणत्या ठिकाणी पोहोचायचे आहे ते चांगले ठाउक होतो.  सकाळचा सुर्योदयाचा सुंदर क्षण कॅमेरॅत टिपण्यासाठी कोणते ठिकाण योग्य आहे ते तो सारखा सांगुन पटापट चालण्याला सांगत होता.  मी पण तो क्षण पहाण्यासाठी अतीशय उत्सुक झालो होतो.... हरी-हर वर चढाई करताना डोंगरातुन अमुकच अशी काही वाट नाही.  पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून पाण्याचा प्रवाहा जसजसा खाली आला व त्याच्या प्रवाहाने जे ओहोळ तयार झाले त्याच आमच्या वाटा. किंवा गुरांच्या चालण्याने ज्या वाटा तयार होतात त्याच आमच्या चालण्याच्या वाटा होत्या.  चालता चालता प्रत्येक वेळी मी हरी-हर कडे बघत होतो.  रात्रीच्या शुभ्र चांदण्यात त्याची छबी मला सारखी खुणावत होती. त्याची एवढी ओढ होती की, त्या चांदण्या रात्रीतच मी त्याचे लांबुन येतील तसे फोटो काढण्यास सुरूवत देखील केली.  पहिल्या टप्यातील डोंगराळ भागातुन आणी पुढे सरळ उभी चढाई करताना माझी थोडी दमछाक होत होती..... ह्दयाचे ठोके एवढ्या जोरात पडत होते की, छाती जवळ नुसता हात नेला तरी तो छातीला न टेकवता त्याची स्पंदन माझ्या हाताला जाणवत होती.  कधी-कधी वाटायच एवढे ठोके वाढले तर अॅटॅक तर नाहीना यायचा परंतु तशी त्याची मला अजीबात काळजी नव्हती.  कारण मी जेव्हा वयाच्या 40 शी मध्ये प्रवेश केला त्या पासुन आज 6 वर्ष झाली दर वर्षी माझी डॉक्टरांकडे नियमित तपासणी, वर्षातुन एकदा पुर्ण फिजीशन प्रोफाईल करून घेणे,इसिजी इत्यादी तपासण्या करत असल्याने मला माझ्या आरोग्याबाबत पुर्ण खात्री असते.  रोजच 4 कि.मी चालणे सुरू असल्याने मला या गोष्टींची तशी काळजी नव्हती.  परंतु छातीचे ठोकेच इतक्या जोराने वाजायचे जणु कोणीतरी डि.जे. लावलाय काय असाच भास व्हायचा.


      पहिला टप्पा पार करत आम्ही एका माळरानावर पोहोचलो. संकल्प राजपंगे हा मुलगा त्या मानाने भराभर चालत केव्हाच पुढच्या टिम बरोबर खुप पुढे गेला होता...... याचे वैशिष्ट, तो शेवट पर्यंत जाताना आणि येताना सर्वांच्या पुढेच होता.............अशातच, तोपर्यंत सुर्योदयाला सुरूवात झाली होती.... सुर्याच्या प्रभा डोंगरांच्या कुशीतुन जणु आम्हा ट्रेकर्सना पाहण्यासाठी, आमचा उत्साह वाढवण्यासाठीच येत आहेत असा भास होत होता.  




     आता थोड्या वेळाच सुर्योदय होणार असल्याने त्याचे ते विलोभनिय दृष्य बघण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो.  थोडावेळ विश्रांती घेउन आम्ही सुर्योदय पाहण्याच्या महत्वाच्या ठिकाणी निघालो. विश्रांती म्हणजे धीरजच्या सुचने प्रमाणे जेम-तेम 3 ते 4 मिनीटे... 3 ते 4 मिनीटे म्हटल्यावर तुम्हाला हसु आल असेल ना....  पंरतु आमची विश्रांती ही अशीच उभ्या-उभ्या सुरू होती...... तिथुनच त्या हरी-हरचे दर्शन झाले... त्या दगडात कोरलेल्या उभ्या सोट पाय-या...... पाय-या चढुन गेल्यावरचा तो दगडांनी बांधलेला मुख्य दरवाजा आता काडीपेटीच्या आकारात दिसत होता.



      हरी-हर गडाच्या मुख्य पायथ्याशी पोहोचण्यापुर्वी आणखी एक टप्पा पार करावा लागतो. काहीसा अवघड..... एक सरळ डोंगर चढत जायचा. हा डोंगर चढताना पायाच्या जोरावर चढाई असल्याने व कोणताही आधार नसल्याने इथे देखील तुमच्या हिंमतीचा कस लागतो.  जरा जरी पाय घसरता की चुकीला माफी नाही.... खाली गडगडत 100 फुट मोकळ्या मैदानात जायच..... डोंगराच्या एका बाजुने प्रवास...... 


 एका ठिकाणी एका झाडाच्या आधाराने त्याच्या मुळांनी डोंगराला,खडकांना अस काही घट्ट पकडून ठेवल आहे की जणु येणा-या प्रत्येकाला त्याचा हेवा वाटावा....जसे, प्रत्येक कुटुंबातील वडील आपल्या मुलांना प्रसंगात सावरण्यासाठी घट्ट आधार देतात अगदी तसेच.... त्या झाडाचा मला खुप हेवा वाटतो.  कीती जणांना त्याने आपल्या शरीरावर, हाता-खांद्यावरून हरी-हर पर्यंत पोहोचवलेय..... आमच्या ही संपुर्ण ग्रुपने त्याच्या भक्कम
मुळांच्या आणी फांद्यांच्या आधारे जवळ जवळ 8 ते 10 फुटाचा भाग चढून पार केला.  या झाडा जवळच्या  टप्यात जात असताना तो अविस्मरणीय सुर्योदयाचा क्षण आला.  दोन डोंगराच्या मधुन प्रथम सुर्याची किरणे आमचे स्वागत करण्याला आली.  आम्ही देखील त्याच्या आगमनाने भाराहून गेलो काहींनी हे क्षण कॅमेरात कैद केले.... सुर्योदय सुरवात झाली सुर्यदर्शन झाल्याने त्याच्या सोनेरी किरणांनी आजु-बाजुचा परिसर न्हाऊन निघाला....





      झाडाच्या आधारे आम्ही ती 10 फुटाची चढाई पार करून आम्ही थोड्या वेळाने हरी-हर गडाच्या पायथ्याशी आलो आणी मी वाचलेले त्या गडाचे वर्णन आठवले....
येथे थोडी विश्रांती घेतली......



           
 इथपर्यंतच्या प्रवासात सरपंचांचा एक कुत्रा आमच्या सोबत आला होता.  आता 80 अंशात दगडात कोरलेल्या पाय-या चढण्याला सुरूवात करावयाची होती.  या पाय-या माझ्या दृष्टीस पडताच मी पुर्ण भाराऊन गेलो.  अनेक प्रश्न मनात घोंगावत होते.  या पाय-या त्या सुध्दा 80 अंशाच्या कोनात कोणत्याही आधारा शिवाय कशा कोरल्या असतील ?, त्याला किती दिवस लागले असतील ?, त्या कोरण्यासाठी कोणकोणत्या हत्यारांचा वापर केला असेल ?, हे पाय-या कोरणारी लोक दररोज गावातुन येत होती की इथेच थांबत होती ?, असे एक नाही तर भाराभर प्रश्न सतत पडत होते.  या प्रश्नांची उत्तर आजही मला न मिळाल्याने ती शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे.  माझ्या प्रश्नांना उत्तरे देणारा इतिहास इंटरनेटवर मला अद्यापी मिळालेला नाही.

      या पाय-यांची रूंदी साधारणत: एक मीटरची म्हणजे जवळ-जवळ 3 फुटाची आहे. अशा या पहिल्या टप्यातील 120 पाय-या चढताना आजु बाजुला धरायला काहीही नसल्याने प्रत्येक पायरीच्या वरच्या बाजुला दोन्ही हातानी धरता याव म्हणुन एक खोबणी सारखा खड्डा केलेला आढळतो.  या खोबणीत दोन्ही हातानी घट्ट धरून या पाय-या चढाव्या लागतात.  उतरताना मात्र प्रचंड घाबरगुंडी उडते.  जो धीट आहे, जो सक्षम आहे, जो साहसी आहे, आणी महत्वाचे जो शांतपणे सुरक्षितपणे उतरण्याचा मनात विचार करतो फक्त आणी फक्त तोच या पाय-या उभ्याने उतरू शकतो.

     
       आम्ही या पाय-या चढायला सुरूवात केली.  नेहमी प्रमाण प्रथम अरविंद पुढे तो प्रथम वर जाणार, नंतर प्रत्येकाने जायच पण एक व्यक्ती शेवटपर्यंत पोहोचल्या शिवाय किंवा किमान दोघांमध्ये 15 ते 20 पाय-यांचे अंतर सोडून चढाईला सुरूवात करण्यात आली.  परंतु यात प्रथमच एक अडथळा आला..... तो म्हणजे सरपंचांचा .... हा कुत्रा सारखा वर जायचा आणी पुन्हा बाकीच्यांना न्यायला खाली यायचा.... एका वेळी एकच जण या पायरीवरून जाउ शकत असल्याने त्याच्या येण्या जाण्याचा त्रास...... तर काही मैत्रीणींना त्याची भिती वाटत होती....... आता करायच काय हा प्रश्न सर्वांना पडला..... मग आमच्या कडे असणारी बिस्कीट दाखवत अरविंदने त्याला बोलवत बोलवत वर पर्यंत नेला...... तरी तो मध्येच गमती जमती करतच होता... याने मात्र शेवटपर्यंत आमची साथ सोडली नाही हे वैशिष्ठच......

      या 85 अंशात कोरलेल्या पाय-या पार करून आम्ही मुख्य दरवाजा पर्यंत पोहोचलो. जाताना मी थांबुन एक व्हिडीओ व काही फोटो काढत होतो..... अवघड ठिकाणी फोटो काढण्याला राकेशला व मलाच फक्त परवानगी होती............मुख्य दरवाजा जवळ सर्वांनी थांबायच ठरले होते.  तिथुन नंतर पुढचा आणखी अवघड प्रवास सुरू झाला.... एका बाजुला भिंत..... या भिंतीत अंदाजे 5 फुटाचे भुयार कोरलेले...... भुयार म्हणजे ते एका दरीच्या बाजुने पुर्ण उघडे.......त्याची रूंदी अवघी 2 फुटाची........ म्हणजे भिंतीला चिकटून मान खाली घालुन, वाकुन चालायच..... त्यात पाठिवरील बॅगा सांभाळायच्या....... यात जर तोल गेला तर .........कडेलोटच.........खाली खुप खोल दरी...... परंतु येथुन समोर दिसणारा नयनरम्य देखावा पाहुन डोळ्यांचे पारणे फिटते......... याच ठिकाणी एक
दगडात कोरलेली दुर्बींण आहे....... या दुर्बिणीच मला खुप कुतुहल होत.... का बरे हि तयार केली असेल...... दगडात जेव्हा हे भुयार कोरल तेव्हा दरीच्या बाजुची भिंत पुर्ण काढून टाकली. ती काढताना एका ठिकाणी ती थोडी शिल्लक ठेवुन त्याला एक होल (भोक) तयार करून ठेवल.... आणी यालाच दुर्बिण म्हणतात..... मला त्याबद्दल खुप कुतुहल असल्याने मी त्याच निरीक्षण केल तेव्हा अस लक्षात आल की,  आणप समोर
उघड्या भागातुन समोर बघीतल्यास संपुर्ण परीसर अतीशय सुंदर दिसतो.  उंच उंच डोंगर, द-या, विस्तीर्ण भाग..... परंतु या दुर्बिण रूपी भोकातुन पाहिल्यास ठराविकच एरीया (भाग) दिसतो...... शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी याचा खुप चांगल्या पध्दतीने वापर होण्यासाठी या दुर्बिणीची निर्मीती केलेली असावी......... त्यावेळच्या आर्किटेक्चर हा कोणत्या शाळेत-कॉलेजात आणी हो.... आधुनिक सामुग्रींच्या सहाय्याने शिकलेला नव्हता..... परंतु त्यांची बौध्दीक क्षमता उच्चकोटीची होती हे यावरून लक्षात येते.
      

      हा टप्पा पार करून आम्ही पुन्हा एकदा अवघड चढाई पाय-यांवरून सुरू केली इथे सुध्दा
आधाराला काहीच नाही..... फक्त दगडात हातने धरण्यासाठी खोदलेल्या खोबणी.... यानंतर पुन्हा एक भुयार रूपी आकाशाकडे जाणारी वाट..... याच वैशिष्ट अस होत की ती आकाशाच्या बाजुने मोकळी आणी बाकीच्या बाजुने बंद....... आणी पाय-या..... पाहिल्या की राहून - राहुन वाटत..... कसे प्लॅन आखले असतील या लोकांनी...... ही अवघड वाट चढुन आम्ही जराश्या मोकळ्या जागेत जाउन पोहोचलो..... 5 मिनिटांची विश्रांती..... आमचा सोबती कुत्रा पुढे येवुन थांबला होता..... त्यालापण धाप लागली होती.....

     आता त्याला पाणी कस द्यायच हा प्रश्न आम्हाला पडला..... आमच्या ग्रुप मध्ये पुनम गडकर...... जरा प्राणी प्रेमी होती म्हणा ना.....तस मला ही पण खुप प्राणी आवडतात म्हणुन मी पण या मध्ये लगेचच सहभागी झालो.  माझ्या बॅगेत पेपर डिश होत्या ..... ठरल पुनमला एक पेपर डिश दिली..... त्यामध्ये पाणी ओतुन पुनमने ती आपल्या हातात धरली आणी त्या आमच्या सोबती मित्राला आम्ही पाणी पाजल..... तो क्षण माझ्यासाठी आठवणीचा ठरला.....लगेच तो कोणीतरी कॅमे-यात टिपला...... हा माझ्या या ट्रेक मधला अत्यंत आवडता फोटो.....

       आता अवघड गोष्टी तशा संपल्या होत्या. आता शेवटचा टप्पा गाठायचा होता.... आम्ही तिकडेच निघालो...... जाताना वाटेत मारूतीच छोटस मंदिर लागत..... मी नमस्कार करून पुढे निघालो....... वाटेतच महादेवाच मंदिर....आणी त्याच्या शेजारीच एक पाण्याच तळे....तिथुन पुढे
गेल्यावर मोकळा विस्तीर्ण भाग ..... याच भागावर एक शिवकालीन घुमटीच्या आकाराची खोली बांधलेली आहे..... तीच्या घुमटीच्या विटा आणी छत आजही जशास तस शाबुत आहे.  या घुमटीच्या शेजारीच पाणी साठवण्यासाठी काळ्या दगडात पाडलेल्या छोटे छोटे चौकोनी आकाराचे खड्डे ( तळी ) आहेत....अशी 6-7 तरी तळी या भागात आढळतात..... या उन्हाळ्यात पाण्याच्या उपयोगासाठी साठवणुक
टाक्या म्हणुन तयार केलेल्या आहेत...... येथुनच मी पुढे एका कड्याच्या ठिकाणी सहज फोटो काढण्याकरीता चालत गेलो असताना मला उंदरांनी पाडलेली बिळे दिसली.  मी सहज म्हणुन एका बिळात दगड टाकला तर मला चक्क तो खाली आत पाण्यात पडल्याचा आवाज आला आणी माझी जिज्ञासा जागृत झाली........ माझ्या लगेच लक्षात आल की या मोकळ्या जागेच्या खाली प्रचंड पाणी आहे..... पण कस मला प्रश्न पडला...... अनेक जणांनी  या गडावर ट्रेक केला असेल ..... आमच्या धीरजच्या टिमने पण ट्रेक केलेत परंतु त्यांना हे लक्षात आलय का ते मला ठाउक नाही.  मी याचा शोध घेत घेत चालत पुनश्च जिथे पाणी साठवण्याची छोटी छोटी तळी आहेत तिथपर्यंत गेलो आणी आसपासच्या इतर तळ्यांचा थोडक्यात अभ्यास केला असता अस लक्षात आल की, हि सर्व तळी भुमिगत असून एकमेकांना जोडलेली आहे.  म्हणजे प्रथम तळी पाडुन तळातुन
या विस्तीर्ण माळावर आतुन बोगदे खणुन ते एक-मेकांना अंतर्गत जोडलेले आहे..  व मी वर नमुद केलेली ती उंदरांची बिळ नसुन पावसाळ्यात पडणारे पाणी या छिद्रांतुन आत जाउन त्याची साठवणुक व्हावी हा शास्त्रीय सिध्दांत....... या तळ्यांच्या आजु बाजुला देखील कातळावर पडलेले पाणी या तळ्यात येण्यासाठी तिरके छोटे-छोटे चर या तळ्यांपर्यंत पाडलेले दिसतात........ खरच एक अभ्यासपुर्ण गोष्ट आहे..... पुनश्च जाणे झाल्यास याचा वेळ
काढुन अभ्यास करणार आहे हे नक्कीच.

      येथुन आम्ही निघालो या गडाच्या शेवटच्या टप्प्याकडे  येथे ट्रेकचा शेवट होउन परतीचा प्रवास सुरू होतो..... येथे जाताना पुनश्च एक छोटासा परंतु अत्यंत अवघड, प्रचंड घसरणारी माती असणारा टप्पा सुरू होतो.... एकमेकांचे हात धरून हा टप्पा पार करून आम्ही एका 10 ते 15  फुटी काळ्या कड्याच्या खाली आहो.  आता हा

कडा चढायचा झाल्यास उतरणे अशक्यच .... परंतु जिद्दीच्या मेंबरची जिद्द अफाट त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी नेल....आम्ही शेवटच्या ठिकाणी सकाळी 8.30 वाजता पोहोचलो.  सकाळी 5.10 ते सकाळी 5.30 असा जवळ जवळ 3.30 तासाचा प्रवास अविस्मरणीय होता.  आम्ही तिथे जवळ जवळ 1 तास बसतो.....या ठिकाणी जेम तेम
25 ते 30 व्यक्तीच राहू शकतात.  येथे प्रत्येकाची ओळख......फोटो सेशन आणी परतीचा प्रवास सुरू...





 परतीचा प्रवास सकाळी 9.30 वाजता सुरू केला..... परतीचा प्रवास सुध्दा तेवढाच पाय लटपटणारा.... अंगाला घाम फोडणारा होता.... त्य़ा पाय-या उतरताना खाली दिलसणारी खोल दरी..... अंगाचा थरकाप आणी परमोच्च आनंद देणारा होता..... त्या 80 अंशातील पाय-या .... प्रत्येक पायरी बसुन उतरावी लागते........ या पाय-या उतरून मी पुढे निघालो... डोंगर पार करून उतरताना पुढे मी व मुंबई हुन आलेली मधुरा दाते असे दोघत चालत होतो........  जाताना छातीत ठोके वाढले होते..... परंतु येताना पायात प्रचंड गोळे यायला लागले..... पाय फोल्ड केला की पायाच्या पोट-यांमधुन प्रचंड
कळ यायची एकही पाउल पुढे टाकवेना ...... मग मी आणी मधुराने ठरवल की आता थांबायच ते सरपंचांच्या घरात जाउनच..... आणी त्या सर्व कळा सोसत सोसत आम्ही दोघ निघालो......... जस गाव व गावातील घर दिसु लागली तस मधुराने एक गंम्मतच केली.... येताना आम्ही काळोखातुन बॅटरीच्या आधारे आल्याने पायवाट लक्षात नव्हती... परंतु मला लहान पणापासुन अशावेळी काहीतरी खुणा लक्षात ठेवण्याची सवय असल्याने मी जरी काळोखातुन गेलो असलो तरी जाताना प्रत्येक खुणा लक्षात ठेवत गेलो होतो.  परंतु मधुराने सरपंचांच घर भलत्याच दिशेला दाखवुन तीकडून जाण्याचा आग्रह धरला.  एक 5-50 पावल गेल्यावर माझ्या लक्षात आल की, काहीतरी चुकतय.  मी तीला मग आग्रहाने मी सांगेन त्या रस्त्याने चल अस सांगुन आणल आणी आम्ही बिनचुक सरपंचांच्या घरी दुपारी 1 वाजता आलो.  एक मोठा वळसा चुकल्याने माझ्या पायांनी मधुराचे मनातल्या मनात आभार मानले......

येताना वाटेमध्ये 3 ते 4 वर्षाची मुले आम्हाला गडाच्या पायथ्याशी भेटली....... एवढा उंच डोंगर चढून ही चिमुरडी कशी आली असतील...... त्यांचे पाय कशे दुखले नाहीत....... त्यांच्याकडे मी विचारणा केली तर ही दररोज येतात अस त्यांनी सांगितल.  त्यांना प्रत्येकाला बिस्कीटपुडे दिले...... त्यांचा फोटो काढण्याचा मला मोह आवरलाच नाही.....


        मग दुपारच जेवण..... तासभर झोप.... काल रात्री ज्या जीपने आम्हाला सोडल होत तो पुन्हा नेण्यासाठी आला...... पुन्हा....... कसारा...... येताना मात्र मुंबईत कुर्ल्याला एका ट्रेकर च्या घरी जाउन फ्रेश होउन रात्री 12 च्या दादर सावंतवाडी राज्य राणी रेल्वेने पुनश्च परत आलो.....

      या संपुर्ण ट्रेक मध्ये जिद्दीच्या श्री.धीरज,अरविंद,राकेश, राकेशची पत्नी निलम, प्रतिक्षा कुलकर्णी,मिलिंग मोरे...... यांनी उत्कृष्ट नियोजन केल.... काही कोल्हापुर वरून देखील आले होते.......

           जिद्द ही प्रत्येकातच असते मग ती कमी किंवा जास्त प्रमाणात असु शकते. परंतू दुस-या तरुणांच्या जिद्दीला प्रोत्साहन देउन चांगली पिढी घडवण्याच काम करित असल्याच दिसुन आल.  बर तरुणांच या जिद्दीमध्ये काय घेउन बसलायत हे इतके जिद्दी की त्यांना माझ्या सारख्या 50 शी कडे झुकलेल्या किंबहुना 60 ओलांडलेल्या अनेक लोकांच्या मनातही त्यांनी एक नविन जिद्द निर्माण केली.       हा संपुर्ण ट्रेक अविस्मरणीय ठरला......

काही क्षणचित्र.....
















No comments:

Post a Comment